देवगड देवस्थानचा ‘ब’ वर्गात समावेश

संगमनेर युवा ध्येय
प्रती जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिवरगाव पावसा (ता. संगमनेर) येथील देवगड खंडोबा देवस्थानाला महायुती सरकारमार्फत ‘ब’ वर्ग दर्जा मिळाला असून, लवकरच मंदिर परिसराच्या विकासासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर होणार आहे. या निधीतून देवगड देवस्थान परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात येणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
चंपाषष्ठी उत्सवानिमित्त हिवरगाव पावसा येथे आयोजित कार्यक्रमात आमदार खताळ यांच्या हस्ते खंडोबा महाराजांची महाआरती करण्यात आली. या कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, देवगड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेव पावसे, विश्वस्त काशिनाथ पावसे, उत्तम जाधव, चंद्रशेखर गडाख, भाजप सरचिटणीस गणेश दवंगे, केशव दवंगे, शिवसेना अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख सोमनाथ भालेराव आदी उपस्थित होते. यावेळी आमदार खताळ यांच्या हस्ते देवगड खंडोबा गडाच्या पायथ्याशी उभारण्यात येणाऱ्या राजे उमाजी नाईक स्मारकाचे भूमिपूजन, तसेच हिवरगाव पावसा परिसरातील वीज रोहित्राचे उद्घाटन करण्यात आले.
खताळ म्हणाले, तालुक्यातील विविध देवस्थानांच्या सभामंडपासाठी निधी मिळावा या मागणीवर मी प्रामाणिक पाठपुरावा केला. आमदार निधीतून सर्व देवस्थानांसाठी आवश्यक मदत देण्याचा माझा प्रयत्न आहे.
