संघर्षमय जीवनातून घडलेले शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे – स्व.गोविंदराव येसुजी सदगीर
संघर्षमय जीवनातून घडलेले शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे – स्व.गोविंदराव येसुजी सदगीर

*प्रस्तावना -*
जर एखाद्याच्या आयुष्यात अडचणी आणि समस्या असतील तर त्याचा अर्थ असा की तो यशाकडे वाटचाल करत आहे. कारण जीवनात वारंवार पराभव झाल्यानंतरही धैर्य ठेवणे आणि अडचणी मागे सोडून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणे, हा एक संघर्ष आहे. प्रत्येक व्यक्तीला जीवनात संघर्षाचा सामना करावा लागतो, कारण संघर्ष हेच जीवन आहे. ज्याला या जगात यश मिळाले आहे, त्याला ते यश केवळ त्याच्या संघर्षांमुळेच मिळाले आहे. जीवनात संघर्षाला पर्याय नाही, काही क्षेत्रे अशी असतात जिथे तुम्हाला थोडे कमी काम करावे लागते आणि काही क्षेत्रात जास्त काम करावे लागते. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे हे एक कठीण काम असते. पण संघर्ष हे जीवन जगण्यासाठी सर्वात कठीण काम असते. कारण संघर्ष हाच आपल्या चारित्र्याला तुम्ही काय करू शकता हे बनवतो.
*बालपण -*
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील डोंगर माथ्यावर दुर्गम प्रदेशात वसलेले कोंभाळणे हे अति मागास असणारे एक खेडेगाव आहे. याच खेडेगावात स्व.गोविंदराव सदगीर यांचा १ जून १९३८ रोजी जन्म झाला. आई-वडिलांचा पारंपारिक शेती हाच व्यवसाय होता. लहान असतानाच म्हणजे अवघे दोन वर्षाचे असताना गोविंदराव यांचे वडील येसुजी सदगीर यांचा देहांत झाला व या बालवयातच गोविंदराव पोरके झाले. वडिलांचे छत्र जरी हरपले असले तरी त्यांची आई ही मुलांचा संभाळ करण्यासाठी भक्कम होती. प्रचंड हलाखीची परिस्थिती असताना देखील त्यांच्या आईने सर्व मुलांचा उच्च संस्काराने सांभाळ केला. गोविंदराव यांना लहानपणापासूनच शिक्षणाची प्रचंड आवड होती. परंतु वडिलांचे छत्र हरपल्यामुळे व घरच्या कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे गोविंदरावांना पुढील शिक्षण घेणे शक्य नव्हते. आणि म्हणूनच त्यांचे शिक्षण थांबले गेले.
*शिक्षण -*
गोविंदराव यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीचे असल्याने त्यांना शिक्षण घेणे शक्य नव्हते. परंतु त्यांना शिक्षणाची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. आणि म्हणूनच त्यांनी पुढे शिक्षण घेण्याचा ठाम निर्णय घेतला. त्यासाठी मोल मजुरी करून, इतरांच्या घरी सालाने राहून गोविंदराव यांनी आपले शिक्षण स्वतःच्या कमाईवर चालू ठेवले. प्रचंड मेहनतीने, कष्टाने ते प्रत्येक वर्गात पहिल्या क्रमांकाने पास होत गेले. त्यांचा सर्वात आवडता विषय म्हणजे गणित. गणित या विषयावरती त्यांचे प्रचंड प्रभुत्व होते. इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर गोविंदराव यांनी मास्तरकीची नोकरी करण्याचे धाडस केले. गोविंदराव यांना कुस्तीची प्रचंड आवड असल्याने बालपणापासून ते वयाच्या ३५ शीपर्यंत कुस्ती खेळत होते. लहानपणी पूर्ण न झालेला छंद त्यांनी मध्यम वयात आल्यानंतर केला.
*नोकरी आणि कुटुंब -*
मास्तरकीची नोकरी मिळाल्यानंतर थोड्याफार प्रमाणात सदगीर कुटुंबात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण तयार झाले होते. मासिक ७० रुपये पगारावर गोविंदराव यांनी आपल्या नोकरीची सुरुवात केली. घरामध्ये आठराविश्व दारिद्र्य असताना देखील ते डगमगले नाही. त्यांची संपूर्ण शेती ही भाऊबंदकीत गहाण ठेवलेली होती. गोविंदराव यांचे कुटुंब खूप मोठे होते. त्यामध्ये तीन भाऊ व एक बहीण असा सर्व प्रपंच हा गोविंदराव यांच्या नोकरीवर चालू असल्याने कुटुंबात काही गोष्टींची कमतरता भासत होती. गोविंदराव यांचे लग्नाचे वय झाले होते, परंतु गरीब परिस्थिती असल्यामुळे कोणीही त्यांना मुलगी देण्यास तयार होत नव्हते. गोविंदराव हे प्रचंड मेहनती, हुशार, कर्तृत्ववान असल्याचे पाहून त्यावेळेसचे आदर्श शिक्षक सदानंद बिन्नर गुरुजी यांनी आपली बहीण जिजाबाई उर्फ यशोदा हिचे लग्न गोविंदराव यांच्यासोबत लावून दिले. यशोदाबाई निरक्षर असल्या तरी प्रचंड कष्टाळू, जिद्दी होत्या. एकत्र कुटुंबात कुटुंबाची घडी यशोदाबाई यांनी व्यवस्थित बसवली. गोविंदराव यांना कमी पगार असूनही योग्य नियोजनामुळे त्यांनी भाऊबंदांकडे गहाण ठेवलेल्या जमिनी सोडून तर घेतल्याच शिवाय काही नवीन जमिनी देखील खरेदी केल्या.
*शिक्षण प्रसार -*
शिक्षणाचे महत्त्व गोविंदराव यांना चांगलेच माहिती होते. त्यामुळे आपल्या अवतीभवती कुणीही निरक्षर राहू नये, यासाठी ते प्रयत्न करत होते. दिवसभर आपल्या नोकरीत मग्न असल्यामुळे त्यांना फारसा वेळ मिळत नसे, परंतु आपल्या अवतीभवती असणारे निरीक्षर लोकांना पाहून त्यांना प्रचंड वाईट वाटत असे. कोंभाळण्यासारख्या दुर्गम ठिकाणी शिक्षणाची सोय नसल्याने त्यांनी स्वतःच्या व इतरांच्या मुलांसाठी रात्रीचे वर्ग चालवले व सातवीच्या वर्गाचा शंभर टक्के निकाल लावला. मुलांच्या शिक्षणासाठी समशेरपुर या ठिकाणी गोविंदराव यांनी नोकरी व वास्तव्य केले.
*प्रपंच -*
गोविंदराव यांचा विवाह यशोदा बाई यांच्याशी झाल्यानंतर त्यांच्या संसार वेलीवरती तीन मुले व दोन मुली असे गोंडस फुले उमलली. तीनही मुलांना गोविंदराव व यशोदाबाई यांनी उच्च संस्कार व उच्च शिक्षण दिले. गोविंदराव यांचा मोठा मुलगा बीई प्रोडक्शन इंजिनिअर असून तो नामांकित व्यावसायिक देखील आहे. तर दुसरा मुलगा राजेंद्र एक प्राथमिक शिक्षक असून राज्य पातळीवरील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तो नेहमीच उपलब्ध असतो. गोविंदराव यांचा तिसरा मुलगा भरत हा एक उपक्रमशील शिक्षक म्हणून नवलेवाडी या नामांकित शाळेत शिकत आहे. तसेच सूना कविता, अर्चना, सुनीता यांना गोविंदराव यांनी शेवटपर्यंत मुली सारखी जपली म्हणूनच त्यांची शेवटची सेवा ही तीनही सुनांच्या हातूनच घडली.
*विशेष बाबी -*
गोविंदराव हे शेतकरी कष्टकरी कुटुंबातून स्वतःच्या मेहनतीच्या व हिमतीच्या जोरावर जगत असताना त्यांचे लक्ष क्षणिक मोहापाई कधी विचलित झाले नाही. समाजातील प्रश्न निपक्षपातीपणे सोडविण्यास गोविंदराव यांनी नेहमी प्राधान्य दिले. त्यांचे आचार, विचार, उच्चार हे उच्च कोटीचे होते. शाळांचे उत्तम निकाल लागल्यामुळे राज्यातील पहिला राज्य आदर्श पुरस्कार १९८२-८३ मध्ये गोविंदराव यांना मिळाला. गावच्या कासाई यात्रा उत्सव कमिटीची कार्यप्रणाली ही गोविंदराव यांच्या निगराणी खाली होत असे.
स्व.गोविंदराव येसुजी सदगीर यांनी आपल्या हयातीमध्ये सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांना आपलेसे केले. त्यांचे कार्य हे दीर्घकाळासाठी स्मरणात राहणारे आहे.
