Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

सनराईज महाविद्यालयमध्ये संविधान दिन साजरा 

सनराईज महाविद्यालयमध्ये संविधान दिन साजरा

श्रीगोंदा युवा ध्येय

मोहटादेवी सेवा प्रतिष्ठान संचालित सनराईज महाविद्यालय श्रीगोंदे मध्ये संविधान दिन आणि संविधान उद्देशिका वाचनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व शैक्षणिक वातावरणात पार पडला. भारतीय लोकशाहीची पायाभरणी करणाऱ्या संविधानाचा गौरव करण्यासाठी आणि नागरिकांच्या हक्क–कर्तव्यांची जाणीव दृढ करण्यासाठी दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमास सनराईज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रा.सतिश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून सतिश ओहोळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मुळात संविधान हा भारतीय नागरिकांचा मार्गदर्शक दस्तऐवज असून त्यातील मूल्ये आचरणात आणणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे नमूद केले. उद्देशिका वाचनातून समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता या लोकशाही तत्त्वांची पुनःप्राप्ती होते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्या राजश्री शिंदे यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया, घटक सभेतील चर्चेची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान यांचा विशेष उल्लेख केला. संविधान हे भारताचे आत्मा असून विद्यार्थ्यांनी संविधानिक मूल्ये जपून समाजात सजग नागरिक म्हणून योगदान द्यावे, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांप्रती नवी निष्ठा जपूया, असे आवाहन त्यांनी केले. सामाजिक न्याय, समानता आणि जबाबदार नागरी भावना विकसित करण्यासाठी संविधानाचे नियमित अध्ययन आवश्यक असल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगताना त्यांना प्रेरित केले. शिक्षकवर्गाच्या उपस्थितीने कार्यक्रमाला अधिक शैक्षणिक आणि औपचारिक स्वरूप प्राप्त झाले.

यावेळी रावसाहेब घोडके यांनी भारतीय संविधान जागृती मंजुषा २०२५ या विषयावर मार्गदर्शन केले. महाविद्यालयामध्ये संविधान जागृती मंजुषा हा उपक्रम साप्ताह सुरू होणार आहे, तरी सर्व विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार मॅडम व जोगदंड मॅडम यांनी केले. महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने सहभाग नोंदवला. कला, वाणिज्य व विज्ञान फॅशन डिझायनिंग, ज्युनिअर कॉलेज विभागातील अनेक विद्यार्थ्यांनी संविधान दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी संविधानातील तत्त्वांचे समाजातील स्थान, आजच्या काळातील त्यांची उपयुक्तता आणि तरुणांच्या जबाबदाऱ्या यावर आपली मते प्रभावीपणे मांडली. विद्यार्थ्यांच्या मनोगतांमधून लोकशाही मूल्यांविषयीची जाणीव, संवेदनशीलता आणि राष्ट्रप्रेम स्पष्टपणे जाणवत होते.

कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले. ‘आम्ही भारताचे लोक…’ या शब्दांनी सुरू झालेल्या उद्देशिकेच्या सामूहिक पठणाने सभागृहात एकता, समता आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना अधिक दृढ झाली. शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहवर्धक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. संविधान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांचे संवर्धन करण्याचा संदेश दिला असून अशा उपक्रमांमुळे संवेदनशील, जबाबदार आणि जागरूक नागरिक घडण्यास निश्चितच मदत मिळते.

Leave a comment