अकोल्यात एकल महिलांची उद्योजकता कार्यशाळा
११८ महिलांचा सहभाग; व्यवसायांबद्दल तज्ज्ञांचे मार्गदर्शन
अकोले युवा ध्येय
तालुक्यातील एकल महिलांची उद्योजकता प्रेरणा कार्यशाळा उमेद अभियान व साऊ एकल महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या १८ महिला सहभागी झाल्या. तालुका मिशन वात्सल्य अभियानाने अशी रोजगार कार्यशाळा एकल एकल महिलांसाठी आयोजित करावी अशी सूचना केली होती. तसेच उमेदच्या राज्य कार्यालयानेही एकल महिलांची कार्यशाळा आयोजन करावी असे आदेशित केले आहे. त्यानुसार तालुक्यातील रोजगार करू इच्छिणाऱ्या महिला एकत्र बोलावून त्यांना विविध वक्त्यांनी व्यवसायासाठी प्रेरणा दिली. तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे व गटविकास अधिकारी अमर माने यांनी या कार्यशाळेचे उद्घाटन केले.
तहसीलदार मोरे यांनी महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, प्रशासन त्यांच्या पाठिशी उभे राहील अशी ग्वाही दिली. तर गटविकास अधिकारी माने यांनी बचत गटाच्या योजनेत एकल महिलांना नेहमीच प्राधान्य दिले जाईल असे सांगितले. उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक कुंदन कोरडे यांनी बचत गटाच्या माध्यमातून मिळणारा निधी व रोजगार सुरू करण्याची प्रक्रिया, कर्ज काढण्याची पद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली.
राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. वसंत मनकर यांनी महिलांनी सामुदायिक उद्योग, उभारावेत असे आवाहन केले. साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रण हेरंब कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या ५० उद्योगांची माहिती देत १०० एकल महिलांचे उद्योग सुरू करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक शशिकांत डमाळे यांनी बँकेच्या विविध कर्ज योजना सांगून महिलांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कृषी विभागाचे अतुल पवार यांनी कृषी विभागाच्या महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अधिकारी अर्चना एखंडे यांनी प्रार्थना घेतली व महिलांनी नैराश्य झटकून दुःखातून बाहेर येत स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करावे अशी प्रेरणा दिली. साऊ एकल महिला समितीच्या प्रतिमा कुलकर्णी यांनी कार्यशाळेचा समारोप केला. यावेळी व्यवसाय करणाऱ्या सीमा भागवत, नीता शिंदे, वैशाली राजगुरू, वंदना सोनवणे, ज्योती नाईकवाडी या महिलांनी आपले यशस्वी उद्योग कसे सुरू केले याची यशोगाथा सांगितली. याप्रसंगी सेंट्रल बँकेच्या साबळे, उमेद अभियानाचे अमर कोळी, उल्हास वैद्य, वैभव लासुरे, ज्योती नाईकवाडी उपस्थित होत्या.
