Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

जागतिक दर्जाची औषध निर्मिती, रोजगाराचीही संधी

गुजरातच्या धर्तीवर राज्यात औषध संशोधन केंद्र

जागतिक दर्जाची औषध निर्मिती, रोजगाराचीही संधी

गुजरातच्या धर्तीवर राज्यात औषध संशोधन केंद्र

मुंबई युवा ध्येय

आरोग्य विज्ञानासाठी जैवतंत्रज्ञान महत्त्वपूर्ण ठरत असून औषध क्षेत्रातील अशा नावीन्यपूर्ण संशोधन आणि विकासासाठी (लाइफ सायन्सेस इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर) सुविधासपन्न भव्य केंद्र उभारण्यासाठी कार्यवाही केली जाईल, गुजरात व आंध्र प्रदेशच्या धर्तीवर औषध संशोधन केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. रोजगार निर्मिती, जागतिक दर्जाच्या औषधे उत्पादनांसाठी संशोधन केंद्राची गरज आहे. हे इनोव्हेशन पार्क निर्माण होणे हे काळाची गरज असून याच्या उभारणीतून महाराष्ट्र हा नावीन्यपूर्ण औषध निर्मिती क्षेत्रात आघाडीवर राहील, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.

मंत्री झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. औषध निर्मिती क्षेत्रातील कंपन्या यासाठी कामे करत असून त्यास मर्यादा आहेत. अशी संशोधन केंद्रे सुरू केली जात आहेत. गुजरात, आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी असे संशोधन केंद्र उभे राहत असून औषधे गोळ्या, कॅप्सूल इत्यादींच्या विकासासाठी, जैविक व रासायनिक संशोधनासाठी फॉर्म्युलेशन लॅबची सार्वजनिक-खासगी भागीदारीतूनदेखील उभारणी केली जात आहे. या दृष्टीने कार्यवाही करण्यात येणार आहे. या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे औषध, बायोटेक, मेडिकल उपकरणे डायग्नोस्टिक्स आणि डिजिटल हेल्थ या क्षेत्रांतील नावीन्यपूर्ण स्टार्टअप्सना आधुनिक सुविधा, तांत्रिक मार्गदर्शन तसेच निधी उपलब्ध होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

*औषध निर्मिती क्षेत्रात गुंतवणुकीत वाढ होईल : झिरवाळ*

राज्यातील औषध निर्मिती उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढ होईल, स्टार्टअप्सना मार्गदर्शन, प्रशिक्षण सुविधा, रोजगार निर्मिती, जागतिक दर्जाच्या औषधे उत्पादनांसाठी परिपूर्ण संशोधन संस्था म्हणून काम करेल, असे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले. बैठकीत अन्नसुरक्षा अधिकारी, गुण नियंत्रण व दक्षता शाखेचे अधिकारी होते. हे इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर झाल्यास राज्यातील आरोग्य, औषध निर्मिती व बायोटेक क्षेत्रातील नावीन्याचा जागतिक केंद्रबिंदू बनण्यास मोठी गती मिळेल. राज्याला स्पर्धात्मक लाभही मिळेल, असे ते म्हणाले.

Leave a comment