Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेचा जिल्हा मेळावा उत्साहात.

वारंवार होणाऱ्या दिव्यांगत्व पडताळणी प्रक्रियेला तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा.

 

अहिल्यानगर ( युवा ध्येय ) महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटना, मुंबई 32 या शासनमान्यता प्राप्त संघटनेचा मेळावा नगरमध्ये उत्साहात पार पडला. राज्य सह कोषाध्यक्ष संतोष सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात सध्या शासनाकडून सुरू असलेल्या दिव्यांगत्व पडताळणी प्रक्रियेविषयी तीव्र विरोध दर्शविण्यात आला. ही प्रक्रिया किती वेळा राबवायची याला कुठेतरी मर्यादा असायला हवी. दिव्यांग प्रमाणपत्राची कायमस्वरूपी वैधता असणाऱ्या दिव्यांगांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता नसते (उदा. हात/पाय गमावणे, डोळ्याची दृष्टी गमावणे) त्यांना कायमस्वरूपी वैधतेचे प्रमाणपत्र त्वरित देण्यात यावे, जेणेकरून नूतनीकरणाची गरज भासणार नाही, अशी आग्रही भूमिका यावेळी मांडण्यात आली.

सौम्य अपंगत्वासाठी किंवा केवळ नूतनीकरणासाठी प्रत्यक्ष उपस्थितीची सक्ती न करता, ऑनलाइन कागदपत्रे सादर करण्याची व्हिडिओ कॉल द्वारे सोय उपलब्ध करावी. जिल्हा/तालुका स्तरावर अधिकार तपासणी आणि प्रमाणपत्र वितरण/नूतनीकरणाचे पूर्ण अधिकार जिल्हा शल्य चिकित्सक किंवा जिल्हा पातळीवरील वैद्यकीय मंडळाला देण्यात यावेत, जेणेकरून लांबचा प्रवास करण्याची गरज टळेल. शासनाने जबाबदारी निश्चित केलेल्या वैद्यकीय अधिकारी तज्ज्ञांनी स्वतःची भूमिका ही दिव्यांग सहानुभूती न ठेवता स्वतःची जबाबदारी निश्चित करून बोगस आणि शंकास्पद प्रमाणपत्रे वितरित होऊ देऊ नयेत. प्रशासकीय बाबी सरल आणि सुलभ करण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करून सर्व वैद्यकीय आणि प्रशासकीय प्रक्रिया एकाच ठिकाणी सुव्यवस्थित कराव्यात, जेणेकरून वेगवेगळ्या विभागांमध्ये वारंवार जावे लागणार नाही. यामुळे वेळेची बचत आणि आर्थिक बोजा कमी होईल. वारंवार तपासणीमुळे दिव्यांगांचा अमूल्य वेळ आणि प्रवासाचा मोठा खर्च होतो. हे मानवाधिकार आणि आर्थिक न्यायाचे उल्लंघन आहे, असे शासनाच्या निदर्शनास आणून देण्याची ठरले आहे.

राज्य सह कोषाध्यक्ष संतोष सरवदे यांनी ठोस भूमिका घेऊन वारंवार तपासणी ही दिव्यांगांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन असून, ती त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम करते. त्यामुळे, कायमस्वरूपी अपंगत्वासाठी कायमस्वरूपी प्रमाणपत्र आणि इतर प्रकरणांसाठी डिजिटल आणि विकेंद्रीकृत तपासणी प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. उगीच दिव्यांगांना नाहक त्रास देणे बंद करावे. अन्यथा यासाठी फार मोठे आंदोलन छेडले जाईल असे संघटनेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना लवकरच करण्यात येणार असून, त्या अनुषंगानेही सकारात्मक चर्चा झाली. लवकरच सभासदांचा डेटा बेस तयार करून नियुक्ती अधिकारी यांना दिला जाईल. अशाप्रकारे संघटनेच्या भविष्यातील दिशा, धोरणे आणि कार्यपद्धती यावर उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. मेळाव्यास सभासद बाळासाहेब चव्हाण,सोपान शेटे, स्वप्नील शिंदे, अनिल ओहळ, भाऊसाहेब लाड, श्रीकांत दळवी, राजेंद्र वाबळे , योगेश सूर्यवंशी, नेहुल महेश,शरद घुले,महेश जाधव ,सोमनाथ रोहकले ,अमोल चन्ने , किरण माने,गजानन मुंडलिक, अहिरे भरत, राजेंद्र ठुबे, दत्तात्रय हजारे ,प्रवीण एडके, शेख रियाज,अशोक सोनवणे, किशोरी भोर, सुंदरबाई फलके, अनिता जंबे, रोहिणी लगड आदी उपस्थित होते .

 

*चौकट*

 

*पोलिस निरीक्षक गायकवाड यांचा सत्कार.*

 

कोतवाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यातील आरोपींना पकडून अत्यंत कौतुकास्पद आणि धाडसी कामगिरी केली आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि कठोर परिश्रमामुळे गोरगरीब व गरजू दिव्यांगांचा विश्वास वाढला आहे. त्यांचे हे कार्य कायदा आणि सुव्यवस्थेसाठी प्रेरणादायी आहे.

यावेळी उपस्थित दिव्यांग कर्मचारी संघटना राज्य सहकोषाध्यक्ष संतोष सरवदे आणि शिर्डी संस्थान मधील दत्तात्रय हजारे यांनी त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Leave a comment